जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । नाशिककरांसाठी पाणीपुरवठ्याबाबत एक महत्वाची बातमी आहे. महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणीपुरवठा विभागाकडून उद्या शनिवारी (दि. २२) तांत्रिक काम करण्यात येणार असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारीही (दि. २३) कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा असे आवाहन पालिकेने केले आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ येथे स्काडा प्रणाली बसविण्याचे काम होत आहे. त्याअनुषंगाने पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र व विविध जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) येथे शनिवारी (दि. २२) तांत्रिक कामे होणार आहेत.
यासह पाणीपुरवठा विभागातील विविध ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उप वितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉलची दुरुस्ती, व्हॉल्व्ह बदलणे इत्यादी देखभाल दुरुस्तीचे कामे करण्यात येणार असल्याने पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर रविवारी (दि. २३) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. सोमवारचा पाणी पुरवठा पूर्ण क्षमेतेने होणार असल्याचे पालिकेच्या सांगितले.
मागील काही महिन्यात पाणी पुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. विस्कळीत पाणी पुरवठ्यावरून वारंवार आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर, पाणी पुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्याची धडपड केली जात आहे.