स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ३८५ जागांसाठी २८ मार्चपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. राज्य लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता जोमाने अभ्यासाला लागावे लागणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ या परीक्षेचे परिपत्रक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेत विविध विभागात एकूण ३८५ रिक्त पदे भरली जातील.
ज्यामध्ये राज्य सेवेसाठी १२७, महाराष्ट्र वन सेवेसाठी १४४ आणि बांधकाम विभागात महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवांसाठी ११४ पदे समाविष्ट आहेत. ही परीक्षा रविवार २८ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २८ मार्च ते १७ एप्रिलपर्यंत सुरू असेल. उमेदवार २१ एप्रिलपर्यंत बैंक चलनाद्वारे शुल्क भरू शकतात.
काही खात्यांमध्ये रिक्त जागा
शासनाच्या काही खात्यांमध्ये अद्यापही अनेक रिक्त जागा आहेत; परंतु खात्यांकडून ही माहिती शासनाला पुरवली जात नाही. त्यामुळे कमी जागांची जाहिरात निघाल्याची भावना उमेदवारांमध्ये आहे. मेगा भरती झाल्यास उमेदवारांना संधी वाढतील. त्यामुळे ही माहिती पाठवावी असेही बोलले जाते आहे.