---Advertisement---

आला रे आला ! मान्सून केरळात धडकला; महाराष्ट्रात कधी येणार?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २५ मे २०२५ । भारतीय हवामान खात्याने सर्वांना एक आनंदाची बातमी दिलीय. ती म्हणजे मान्सून देशात दाखल झाला. मान्सून नियोजित तारखेच्या आठ दिवस आधीच म्हणजे शनिवारी केरळमध्ये पोहोचला, असे हवामान खात्याने स्पष्ट केले. दरम्यान, केरळात दाखल झालेला मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, पुढच्या दोन दिवसातच मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.

यंदा मान्सून ८ दिवसआधीच केरळात दाखल झाला. यापूर्वी २००९ मध्ये मान्सून २३ मे रोजी दाखल झाला होता. सध्या मान्सूनने केरळसह कर्नाटक, तामिळनाडू, गोव्याची किनारपट्टी व्यापली आहे. हवामान खात्याच्या मते, येत्या २-३ दिवसांत मान्सून देशाच्या ४०% भागाला व्यापू शकतो. तर दोन ते तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, मिझोराम, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या मते, मान्सून लवकर किंवा उशिरा येईल असा निष्कर्ष काढता येत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा पावसावर अवलंबून आहे. वर्षातील एकूणपैकी ७०% पाऊस मान्सूनच्या ४ महिन्यांत पडतो. हवामान खात्याने यंदा १०५% पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या मुंबई, मुंबई उपनगर तसेच ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसाचा इशारा आहे. रायगड, पुणे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, चंद्रपूर आणि नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकणात रेड अलर्ट असून, सातारा-कोल्हापूर घाटात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---