नाशिक लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२५ । महाराष्ट्रातील राजकीय चित्र हळूहळू बदलत आहे, यात कोणतीही शंका नाही. विधानसभा निवडणुकीनंतर, सत्ताधारी महायुतीने सत्ता मजबूत केली आहे, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी कमकुवत होत चालली आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते बाहेर पडत आहेत, आणि त्यांचा ओघ भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडे वाढत आहे. दरम्यान यातच आता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही धक्का दिला आहे. नाशिकमध्ये मनसेच्या एका माजी नगरसेवकाला शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे.
नाशिक हा काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गड मानला जात होता, पण आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने येथे मनसेला धक्का दिला आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत, आणि लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता नाशिकमध्ये मनसेच्या एका माजी नगरसेवकाला शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे.
कोणी केला प्रवेश?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातपूर प्रभाग समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक योगेश शेवरे, उद्धव ठाकरे गटातील तथा नाशिकरोड जेलरोड परिसरातील माजी नगरसेवक पवन पवार आणि काँग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्ह्याध्यक्षा वंदनाताई पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश झाला. एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी, शिवसेना उपनेते तथा नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय (अप्पा) करंजकर, सहसंपर्क प्रमुख राजू (अण्णा) लवटे, महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे, विक्रम नागरे, अभय महादास आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.