नाशिक लाईव्ह न्यूज । औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून उपराजधानी नागपुरात दोन दिवसांपूर्वी मोठा हिंसाचार उफाळला. दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. तसेच अनेक पोलीस अधिकार्यांसह कर्मचारी जखमी झाले. दरम्यान नागपुरातील या संपूर्ण हिंसाचारामागे नेमकं कोण आहे, याचा नाव समोर आले आहे.
नागपुरात झालेल्या हिंसाचारामागे फहीम खान मास्टरमाइंड असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. फहीम खान याने लोकांना भडकवण्याचे काम केले. त्यानंतर ही हिंसा घडली. नागपूरमधील गणेशपेठ पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या तक्रारीमध्ये उघड झाले आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ४६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तक्रारीत नेमकं काय?
या तक्रारीनुसार जमावाने अंधाराचा फायदा घेत महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. औरंगजेबाच्या थडग्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. तसेच औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी, लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आणि धार्मिक शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने जमावाने कुऱ्हाडी, दगड, काठ्या आणि इतर धोकादायक शस्त्रांचा वापर केला.