नाशिक लाईव्ह न्यूज । २५ मे २०२५ । एकीकडे वैष्णवी हगवणे आत्महत्या राज्यभरात संताप व्यक्त होत असून अशातच वैष्णवी प्रकरणाची पुनरावृत्ती नाशिक झालीय. नाशिकच्या गंगापूर परिसरात एका विवाहितेनं आत्महत्या केली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं राहत्या घरीच गळफास घेऊन जीवन प्रवास थांबवला. भक्ती अथर्व गुजराथी (वय ३७) असे मृत महिलेचं नाव असून या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गु्न्हा दाखल केला.
गंगापूर रोडवरील उच्चभ्रू वसाहतीत ही घटना घडली. भक्ती आणि अथर्व यांचा ७ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक ५ वर्षांचा मुलगा देखील आहे. मात्र, विवाहानंतर भक्तीवर सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या वडिलांनी केला.
भक्तीला त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला माहेरी आणले होते. पण, अथर्वने तिला पुन्हा सासरी नेले. मात्र, सासरच्या मंडळींकडून त्रास सुरूच राहिला. अखेर भक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेनंतर भक्तीच्या आई वडिलांनी गुजराथी कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी अथर्व गुजराथी आणि त्याच्या कुटुंबावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
भक्तीच्या शरीरावर जखमांचे अनेक खुणा आढळल्यामुळे ही आत्महत्या की हत्या, याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. तसेच तिच्या लहान मुलाच्या ताब्याबाबतही त्यांनी दावा केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.