नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथून एक खळबळजनक घटना समोर आलीय. २८ वर्षीय विवाहितेने मुलगा व मुलीसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. हर्षाली राहुल अहिरे (२८), मुलगा संकेत (५) व मुलगी आरोही (७) असं मृत तिघांचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान चारित्र्याच्या संशयावरून सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळास कंटाळून तिहेरी आत्महत्येचा हा प्रकार झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हर्षाली हिने चारित्र्याच्या संशयावरून सासरचे लोक तिचा छळ करीत होते,तसेच उपाशीपोटी ठेवून वेळोवेळी तिला मारहाण करीत होते. त्यामुळे काही काळ ती माहेरी निघून गेली होती. या संदर्भात तिने सासरच्या लोकांविरोधात महिला समुदेशन केंद्रात अर्जही दाखल केला होता. मात्र उभयपक्षी तडजोड झाल्यानंतर हर्षाली पुन्हा सासरी नांदण्यासाठी गेली होती. मात्र तिचा छळ सुरूच राहिला व त्याला कंटाळून तिने दोन्ही मुलांसह आत्महत्येसारखे पाऊल उचलले,अशी तिच्या माहेरच्या लोकांची तक्रार आहे.
दरम्यान,हर्षालीची आई ठगूबाई देवरे (ढाढरे, धुळे) यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तिचा पती राहुल सासू, कांताबाई,सासरा दिलीप व ननंद सपना या चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी या करीत आहेत.