नाशिक लाईव्ह न्यूज । फेब्रुवारी संपण्याच्या आधीच नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. जिल्ह्यातील मालेगावाचा तापमानाचा पारा सध्या ३३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले जात असले तरी आगामी काही दिवसात तापमान ३७ अंशांपर्यंत जाणार आहे. यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र आणि कठीण जाणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमान सतत वाढत आहे.
सध्या ३३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले जात आहे. तरी पुढील आठवड्यात ३७ अंशांपर्यंत पारा वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच एवढी उष्णता जाणवू लागल्याने मार्च, एप्रिल आणि मे मध्ये ही स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. उन्हाचा त्रास वाढणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
उन्हाचा चटका वाढल्यामुळे नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीचा शोध घेत आहेत. उष्णतेमुळे डिहायड्रेशन, चक्कर येणे, घामामुळे त्वचेसंबंधी त्रास होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याचा प्रभाव पिकांवरही पडणार असून, शेतकऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला जात आहे. गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीनुसार, मालेगावमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते.