नाशिक लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२५ । पुणे, अहिल्यानगर, शिर्डी आणि नाशिक या शहरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मध्य रेल्वेने पूर्ण केला आहे. हा अहवाल लवकरच रेल्वे मंत्रालयाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे आणि नाशिक दरम्यानचा प्रवासाचा वेळ सध्याच्या पाच तासांवरून अडीच ते तीन तासांवर येण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जुन्नर तालुक्यातील खोडद येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुर्बिण संशोधन प्रकल्प प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी अडथळा ठरत असल्याने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक या नव्या रेल्वेमार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले होते. या निर्देशांनुसार, मध्य रेल्वे विभागातील अभियंत्यांनी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करुन डीपीआर तयार केला आहे.
नवीन प्रकल्प अहवालानुसार, पुणे ते अहिल्यानगर रेल्वे मार्ग सध्याच्या महामार्गाला समांतर राहणार आहे. शिर्डी ते नाशिक नवीन मार्ग निश्चित केला जाणार आहे. त्यानुसार, पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे अंतर २३४ किमी, पुणे-अहिल्यानगर रेल्वे मार्गाचे अंतर १२५ किमी आणि शिर्डी-नाशिक यातील अंतर ८२ किमी आहे. नव्या मार्गिकेमुळे पुणे ते नाशिक यांच्यामधील अंतर दोन ते तीन तासांवर येणाची शक्यता आहे.
पुणे, अहिल्यानगर, शिर्डी आणि नाशिक म्हणजेच पुणे ते नाशिक प्रस्तावित प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाला असून पुढील प्रक्रियेसाठी पुढे पाठवण्यात आला आहे. हा अहवाल आठवडाभरात रेल्वे मंत्रालयाकडे सोपवण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे उपमुख्य अभियंता मोहित सिंग यांनी म्हटले आहे.
पुणे-शिर्डी-नाशिक प्रकल्प सुमारे २३५ किलोमीटर लांब आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी साडेतीन वर्ष लागणार असल्याचे म्हटले जात होते. या रेल्वे मार्गिकेवर १३ मोठी आणि ११ लहान अशी २४ स्थानके असणार आहेत. या प्रकल्पामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.