नाशिक लाईव्ह न्यूज । १ जून २०२५ । जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्व सामान्यांना तेल कंपन्यांनी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे.ती म्हणजे तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत २४ रुपयांची कपात केली आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात अथवा वाढ करण्यात आलेली नाही. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईपासून थोडासा दिलासा मिळाला आहे.
तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २४ रुपयांची कपात केली आहे. नवे दर आजपासून (१ जून) लागू झाले आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) नुसार, दिल्लीत १९ किलोग्रॅमचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आता १,७२३.५० रुपये (पूर्वी १,७४७.५० रुपये), कोलकात्यात १,८२६ रुपये (पूर्वी १,८५१.५० रुपये), मुंबईत १,६७४.५० रुपये (पूर्वी १,६९९ रुपये) आणि चेन्नईत १,८८१ रुपये (पूर्वी १,९०६ रुपये) मध्ये उपलब्ध असेल. या कपातीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांना दिलासा मिळाला आहे.
घरगुती सिलेंडरच्या किमती स्थिर
तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत बदल केले आहेत. पण घरगुती १४.२ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही. दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडर ८५३ रुपये, कोलकात्यात ८७९ रुपये, मुंबईत ८५२.५० रुपये आणि चेन्नईत ८६८.५० रुपये किमतीत उपलब्ध आहे. यापूर्वी ८ एप्रिल २०२५ रोजी घरगुती सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली होती.