नाशिक लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२५ । एकीकडे कांद्याचे भाव वाढण्यासाठी केंद्राने कांद्यावर लावलेले २० टक्के निर्यातशुल्क पूर्णपणे कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी हाेत असताना दुसरीकडे कांदा दरात घसरण सुरु आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याबरोबर उन्हाळ कांद्याच्याही आवकमध्ये मोठी वाढ होत असल्याने कांदा दरामध्ये घसरण झालीय.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या उन्हाळ आणि लाल कांद्याला सरासरी दर १६०० रुपये मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज असून कांदा लागवडीसाठी लावलेला खर्चही वसुल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 टक्क्यांहून अधिक कांद्याची लागवड झाली असल्याने कांदा दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. दोन दिवसापूर्वी कांद्यावर लागू केलेले २० टक्के निर्यातशुल्क तत्काळ पूर्णपणे रद्द करावे यासाठी लासलगाव बाजार समिती आवारात संतप्त शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन करून लिलाव बंद पाडले होते. एकीकडे उत्पादन खर्चात वाढ होत असताना मिळणाऱ्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
उन्हाळ, लाल कांद्याचे दर
लासलगाव कृषी बाजार समितीत मंगळवारी लाल कांद्याला किमान ७००, कमाल १,८५१, तर सरासरी १,६२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला किमान ८००, कमाल १,९५१ तर सरासरी १,६५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.