---Advertisement---

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाट 6 दिवस बंद राहणार ; प्रवासापूर्वी वाचा बातमी..

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । मुंबई-नाशिक महामार्गांवरून (Mumbai Nashik Highway) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे रस्ता दुरुस्तीसाठी मुंबई-नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट (Kasara Ghat) सहा दिवस बंद राहणार आहे. ज्यामुळे तुम्ही या मार्गाने प्रवास करणार असाल तर तुम्हाला थोड्याशा त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी दोन टप्प्यात पुढील 6 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. पहिला ट्रॅफिक ब्लॉक हा सोमवारी २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान राहणार आहे. तर दुसरा ट्रॅफिक ब्लॉक हा ३ मार्च ते ६ मार्च दरम्यान बंद राहणार आहे. या दोन टप्प्यात जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती व पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद राहणार आहे. नाशिकच्या दिशेकडे जाणारी वाहतूक नाशिक मुंबई लेनवरील नवीन कसारा घाटातून वळवण्यात येणार आहे.

सहा दिवस सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या कालावधीत मुंबई-नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. जुना कसारा घाट दुरुस्तीसाठी बंद राहणार असल्याने लहान वाहनांची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळवण्यात येणार आहे. पण तेथे अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे. ही अवजड वाहने मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवण्यात येणार आहेत.

जुन्या कसारा घाटातील डोकावणाऱ्या दरडी, जुने महाकाय वृक्ष या सहा दिवसात काढण्यात येणार आहेत. पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी आतापासूनच खबरदारी घेण्यात येत आहे. सहा दिवसांच्या कालावधीत वाहनचालकांना होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी व मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---