नाशिक लाईव्ह न्यूज । राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा नाशिक (Nashik) दौरा आता जवळ येतोय, परंतु या दौऱ्यापूर्वीच नाशिकमधील शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आणि उपनेते अजय बोरस्ते यांच्यामध्ये अप्रत्यक्ष रणसंग्राम सुरू आहे, ज्यामुळे पक्षातील एकता धोक्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची आभार सभा आणि अंतर्गत वाद
१४ फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेनेची नियोजन बैठक झाली. या बैठकीनंतर राज्याचे शिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
दादा भुसे यांनी नाशिकमधील अंतर्गत वादावर प्रतिक्रिया देताना सांगितलेनाशिकमध्ये शिवसेनेत गट तट नाही, कोणी कोणती जबाबदारी स्वीकारावी यासाठी कमिटी स्थापन करतोय.’, असं म्हणत दादा भुसे यांनी अंतर्गत वादावर पडदा टाकला. तसंच, ‘कुठलंही ऑपरेशन सांगून होत नाही. नाशिकमध्ये देखील छोटे मोठे ऑपरेशन होतील आणि या ऑपरेशनचे मुख्य डॉक्टर एकनाथ शिंदे आहेत असं म्हणत दादा भुसे यांनी पक्षात होणार्या आगामी इनकमिंगबद्दल माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीतील यश आणि आभार सभा
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून मिळालेल्या भरघोस यशाचे श्रेय देताना, दादा भुसे यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यामध्ये दौरा करत कार्यकर्त्यांसोबत जनतेचे आभार मानत आहेत. “१४ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या जनतेचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे नाशिकला येत आहेत. यावेळी शिवसैनिक उपमुख्यमंत्र्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करतील आणि शिवसैनिकांना अशा कार्यक्रमांचा अनुभव आहे,” असं त्यांनी नमूद केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचना
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांना किमान दोन हजार लोकं आभार सभेसाठी आणण्याच्या सूचना मंत्री दादा भुसे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. “सभेसाठी किमान दोन हजार लोकं आणले तरच महापालिका तिकीट मिळेल,” असा सज्जड दम भुसे यांनी पदाधिकार्यांना दिला.