नाशिक लाईव्ह न्यूज । राज्यातील महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये (Ladki Bahin Yojana) चक्क परराज्यातील बोगस लाभार्थीचे रॅकेट समोर आले आहे. लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून बोगस लॉगिन आयडी तयार केले आणि त्याद्वारे चक्क ११७१ अर्ज दाखल केले. अर्ज दाखल केलेल्यांमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमधील रहिवासी दाखवले आहेत. प्रत्यक्षात हे भामटे उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील असल्याचे पोलिस, महसूल आणि महिला व बालविकास विभागाच्या तपासात पुढे आले आहे. याबाबत सोलापुर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ज्या दोन लॉगिनवरून ११७१ अर्ज दाखल झालेले आहेत त्यापैकी २२ अर्ज हे एकट्या बार्शी तालुक्यातील आहेत. या अर्जदारांचा लाभथांबवण्यात आलेला आहे.
शासनाने योजना घोषित केली तेव्हा लाडकी बहीणच्या पोर्टलवर कुणीही लॉगिन आयडी बनवू शकत होते. केवळ मोबाइल नंबर आणि नाव याच्या आधारे हे आयडी बनवता येत होते. याचाच गैरफायदा परराज्यातील भामट्यांनी घेत या आयडींवरून हजारो बोगस अर्ज दाखल केले.
कसे आले उघडकीस?
या योजनेत दाखल झालेल्या सर्व अजांची छाननी करताना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका गावामध्ये काही मुस्लिम महिलांची नावे आढळली. प्रत्यक्षात त्या गावात एकही मुस्लिम नसल्याचे महिला व बालविकास विभागाच्या एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी आधार क्रमांकाशी लिंक असलेले बैंक खाते तपासले. ते खाते सेंट्रल बँकेचे होते. त्यानुसार सेंट्रल बँकेच्या बार्शी शाखेतून संबंधित खातेदारांचे पत्ते आणि मोबाइल काढले असता ते चक्क उत्तर प्रदेश, आसाम, बंगाल, राजस्थान येथील असल्याचे आढळले.
प्रशासकीय त्रुटीचा भामट्यांनी घेतला गैरफायदा
शासनाने अर्जासाठी ladakibahin. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन आयडीचा पर्याय दिला. येथे कुणीही आयडी तयार करून त्याआधारे अर्ज करू शकतो. एकदा तयार झालेल्या आयडीवरून स्वतः सह अन्य कितीही महिलांचे अर्ज त्या आयडीद्वारे करता येतात. याचाच गैरफायदा घेत उत्तर प्रदेशातील व्यक्तीने मुनमुन ठाकरे, अंगणवाडी वर्कर, हजारवाडी, ता. पलूस, जि. सांगली व अनवरा बेगम, अंगणवाडी वर्कर, बोरगाव बु., ता. जि. लातूर या नावाने, पत्त्याने आयडी बनवला. या दोन आयडींवरून तब्बल ११७१ अर्ज भरण्यात आले. प्रत्यक्षात लातूर आणि सांगली जिल्ह्यांतील या गावांमध्ये वरील नावाच्या अंगणवाडी वर्कर अस्तित्वातच नसल्याचे उघड झाले आहे.
एका आयडीवरून ६०० ऑनलाइन अर्ज दाखल बार्शी तालुक्यामध्ये २२ बोगस लाभार्थी सापडले. मात्र, ज्या आयडीवरून २२ जणांचे अर्ज दाखल झाले होते, त्यातील मुनवरच्या ठाकरे आयडीवरून ६०५ तर अनवरा बेगम आयडीवरून ५६६ अर्ज दाखल केलेत. राज्यातील विविध गावांचे त्यावर पत्ते आहेत. प्रत्येक जिल्ह्यात या आयडीवरून दाखल झालेल्या अर्जाची पडताळणी याची पडताळणी केल्यास आणखी बोगस लाभार्थी सापडू शकतात. त्याची तपासणी करणे गरजेचे आहे.