नाशिक लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२५ । महाराष्ट्रामधील अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातच राज्यासाठी आगामी चार ते पाच दिवस महत्वाचे राहणार आहे. कारण हवामान खात्याने आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विशेष नाशिक जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आलं आहे.
नाशिक जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यात काल रविवारी नाशिक शहरासह परिसरात जुलै महिन्यातील रेकॉर्डब्रेक पाऊस बरसला. शनिवारी रात्री ११ वाजता सुरू झालेला पाऊस रविवारी सायंकाळी ५ पर्यंत सुरू होता. या १२ तासात ४० मिमी पावसाची नोंद झाली. यानंतरही रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. आषाढी एकादशीनिमित्त मंदिरांत दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसह रविवार असल्याने खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ सुरू होती. दरम्यान होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात धरणांची पाणी पातळी वेगाने वाढत आहे. गंगापूर धरणातून ५१८६ क्सुसेक विसर्ग केल्याने शहरात गोदावरीच्या जलपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली. दरम्यान आज देखील नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे.
राज्यात कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत देखील आज पावसाचा जोर कायम राहणार आहे. या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
आज मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांना देखील मुसळधार पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. तर राज्यातील उर्वरीत भागात म्हणजे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमधील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यात आहे. या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिकमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. तर दुसरीकडे नागपूरमध्ये आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाने आज नागपूर सह पूर्व विदर्भातील सर्व ६ जिल्ह्यात तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पूर्व विदर्भात सर्वत्र ढगाळ वातावरण असून आज दमदार पावसाची अपेक्षा आहे.