नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून याच दरम्यान नाशिकमधील दिंडोरी- वणी रस्त्यावरील वलखेड फाटा नजीक भीषण अपघाताची घटना समोर आलीय. ज्यात आयशर व कारमध्ये झालेल्या अपघातात पती -पत्नी जागीच ठार, तर मुलगी गंभीर जखमी झाली. सतीश राजाराम बर्डे (43) व सुरेखा सतीश बर्डे (40) असं अपघातातील मयताचे नाव आहे. या घटनेत जखमी मुलीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
वलखेड फाटा येथील वजन काट्यासमोर कार (एमएच 01, डीवाय 0691) व आयशर (एमएच 05, एफजे 8188) यांच्यात भीषण अपघात झाला. यात सतीश बर्डे व पत्नी सुरेखा बर्डे व मुलगी समृद्धी हे तिघे कारने निळवंडी येथून नातेवाइकाकडून करंजवण गावी परतत असताना सोमवारी रात्री कारला वलखेड फाट्याजवळ समोरून येणाऱ्या आयशरने धडक दिली. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले.
जखमींना नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असता पती- पत्नी मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर मुलगी समृद्धी ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कमलेश देशमुख अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, मंगळवारी करंजवण ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवत दाम्पत्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले.