नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमध्ये (Nashik) लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. अशातच आणखी एका लाचखोरीची घटना समोर आलीय. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील घराच्या शेजारील जागा बेघर म्हणून नावे करून देण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपये लाचेची मागणी करत त्यातील तीन हजार रुपये स्वीकारताना जळगाव (Jalgaon) (ता. निफाड NIphad)) ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
किरण दौलत काकवीपुरे (३८) असे त्याचे नाव आहे. त्याला ६० हजार रुपये वेतन आहे. याप्रकरणी निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने एसीबीकडे केलेल्या तक्रारीनुसार जळगाव येथील त्यांच्या वडिलांच्या मालकीच्या घराजवळ रिकामी जागा होती. ती बेघर म्हणून नावे करण्याकरिता तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता.
जागा बेघर करून देण्याकरिता ग्रामसेवक किरण काकवीपुरे याने ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर एसीबीकडे तक्रार करण्यात आली. पथकाने ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचला व ग्रामसेवकास ३ हजार रुपये घेताना अटक केली.