नाशिक लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२५ । मागील काही दिवसात सोने आणि चांदीच्या किमतीने नवनवीन रेकॉर्ड झाल्याचे दिसून आले. आता हे मौल्यवान धातू स्वस्त होतील, ही ग्राहकांची अपेक्षा आता फोल ठरताना दिसून येत आहे. सराफ बाजारात सोने प्रतितोळा ९० हजारांच्या पार गेले आहे. अवघ्या दोनच महिन्यांत सोने तब्बल १० हजारांनी वधारले असून, दरवाढीची गती बघता दसरा, दिवाळी अगोदरच सोने लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या सणासुदीच्या दिवसात अनेकजण सोने-चांदीचे दागिने खरेदी करतात. तसेच लगीनसराईला सुरुवात झाली आहे. त्यामुळेही दागिने खरेदी करण्यासाठी खरेदीदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र त्यातच सोने दराने सर्वकालीन उच्चांक गाठला असून यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे टेन्शन वाढले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून सोने दरातील तेजीने प्रचंड वेग धरल्याने, अवघ्या दोनच महिन्यांत सोने १० हजारांनी वधारले. गेल्या ८ जानेवारी रोजी २४ कॅरेट सोने ७९ हजार ९७० रुपये प्रतितोळा, तर २२ कॅरेट सोने ७३ हजार ५८० रुपये प्रतितोळा इतका दर होता. गुरुवारी २४ कॅरेट प्रतिताेळा ९० हजार ५०० रुपयांवर पोहोचल्याने, अवघ्या दोन महिन्यांत दरात तब्बल १० हजार ५३० रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे. तर २२ कॅरेट सोने ८३ हजार ३०० रुपयांवर दर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी बघता, सोने दर आणखी मोठी उसळी घेण्याची शक्यता आहे.
सोने दराप्रमाणेच चांदी दरातही मोठी तेजी बघावयास मिळत आहे. चांदीने पुन्हा एकदा लाखाचा टप्पा पार केला असून, चांदी आता प्रतिकिलो एक लाख तीन हजार रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या ५ मार्च रोजी चांदीचा दर ९८ हजार रुपये प्रतिकिलो इतका होता. अवघ्या दहा दिवसांत त्यात पाच हजारांची वाढ हाेऊन दर लाखाच्या पार गेला आहे.