नाशिक लाईव्ह न्यूज । १७ मे २०२५ । नांदगावला जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशी चढत असतांना चार महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोत लांबवल्याची घटना येवला बसस्थानकावर घडली. बसचालक व वाहकाने बस थेट शहर पोलीस ठाण्यात नेल्यांनतर पोलिसांनी बसमधील प्रवाशांच्या बॅगा तपासल्या.
येवला-नांदगाव ही बस शुक्रवारी दुपारी चार वाजता येवला बसस्थानकावर उभी होती. बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली या गर्दीचा फायदा घेत चोरांनी चार महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोत लांबवल्या. महिला बसमध्ये बसल्यांनतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. बसचालक व वाहकाने बसचा दरवाजा बंद करत शहर पोलिसांना संपर्क साधल्यांनतर पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांनी प्रवाशांसह बस पोलिस ठाण्यात आणण्याचे सांगितले. त्यानंतर चालक व वाहकाने बस पोलीस ठाण्यात आणली.
प्रवाशांच्या बॅगा तपासूनही पोलिसांच्या हाती काही लागले नाही. ज्या चार महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरी गेली अशांची नावे व पत्ता पोलिसांनी लिहून घेतल्यानंतर बस नांदगावकडे रवाना झाली. पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांनी बसस्थानकावरील सीसीटीव्ही तपासून चोरांचा तपास लावू असे आश्वासन महिलांना दिले