नाशिक लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । नाशिकच्या शरणपूर रोडवर येथे एक धक्कादायक घटना समोर आलीय. लग्नाला होकार देऊन नंतर नकार देणाऱ्या प्रियकरामुळे १७ वर्षीय मुलीने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत सिडकोतील १९ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे.
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या बहिणीची मुलगी व संशयित वेदांत प्रवीण पाटील (१९, रा. महाकाली चौक, पवननगर, सिडको) यांचे प्रेमसंबंध होते. या मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण नव्हते. मात्र, १८ वर्षाची झाल्यावर या दोघांचे लग्न लावून द्यायचे कुटुंबियांनी ठरवले होते. मात्र, चार दिवसांपूर्वी वेदांत पाटीलने प्रेयसीला भेटून ‘मला दुसरी मुलगी आवडते, तुझ्याशी लग्न करणार नाही’ असं तरूणाने प्रेयसीला सांगितलं होतं. त्यानंतर तरूणीला मानसिक धक्का बसला. महिन्याभरापासून तिने आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरूणाने लग्न करण्यास नकारच दिला.
मानसिक त्रास असह्य झाल्यामुळे तरूणीने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. अल्वयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्यानंतर मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, वेदांत प्रवीण पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.