नाशिक लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२५ । नाशिक शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून अशातच नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलासंह तिघांना अटक केली असून चोरट्यांकडून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महागडे मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. दरम्यान पोलिसांनी या टोळीकडून ११ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये नाशिक शहरातील सात तर पुणे जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी आणि दुचाकी चोरी केल्याचे गुन्हा उघडकीस आले आहेत.
एकूणच गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढ झाली होती. सोनसाखळी चोरांना पकडण्याचा मोठे आव्हान नाशिक पोलिसांसमोर होते. सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या अनुषंगाने पोलिसांकडून अजून तपास सुरु आहे.