नाशिक लाईव्ह न्यूज । शेअर्स ट्रेडिंगच्या खरेदी-विक्रीतून नफा कमविण्याचे आमिष दाखवितानाच नामांकित कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून बनावट अॅपद्वारे गुंतवणूकदारांना एक कोटी ३९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी तक्रारीनुसार, संशयित अयन्ना जोसेफ, सेतुरत्नम् रवी या दोघांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी नोव्हेंबर २०२४ ते २६ जानेवारी २०२५या कालावधीत तक्रारदार व्यावसायिकाशी संर्पक साधून शेअर्स ट्रेडिंगसाठी नामांकित कंपनीचे नाव वापरून बनावट इन्व्हेस्टमेंट अॅप तयार केले. त्याद्वारे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये शेअर खरेदी करण्यासाठी जादा परताव्याचे आमिष दाखविण्यात आले.
अॅपच्या माध्यमातून ४१ लाख ६९ हजार ८५१ रुपयांची रक्कम गुंतविली होती. कॅपिटल गेन आणि सर्व्हिस टॅक्सबाबत बिर्ला मनी लि. कंपनीचे बनावट लेटरहेड असलेली नोटीसही गुंतवणूकदाराला मिळाल्याने त्याचाही विश्वास बसला होता. त्यानंतर त्याने ८१ लाख ६१ हजार आणि ७ लाख भरले. कालांतराने वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेरीस पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.