नाशिक लाईव्ह न्यूज । नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. अशीच एक घटना समोर आलीय. ज्यात मंत्री आणि पुढाऱ्यांसोबत ओळख असल्याचे भासवत त्यांच्यासोबतचे फोटो व्हिडीओ दाखवून विश्वास प्राप्त करत मुलास शासकीय नोकरी लावून देतो असे सांगत साडेसोळा लाख रुपये उकळणाऱ्या भामट्याक्रुिद्ध वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर तालुक्यातील दापूर येथील बाळनाथ आव्हाड यांनी या फसवणूकप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विजय दामोदर मस्के (रा. मानोरी, ता. सिन्नर) असे भामट्याचे नाव असून तो सध्या नातेपुते (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे सासूरवाडीस वास्तव्यास असल्याचे म्हटले आहे. तालुक्यातील ओळखीचा असल्याचा फायदा घेत त्याने आव्हाड यांचा मुलगा विशाल यास मुंबई मनपात किंवा वीज मंडळात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवले. त्यापूर्वी त्याने आजी-माजी मंत्र्यांसमवेतचे फोटो आणि व्हिडिओ दाखवत आव्हाड यांचा विश्वास मिळवला.
नोकरी देण्याच्या बदल्यात त्याने डिसेंबर २०२० ते मार्च २०२४ या काळात आव्हाड यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. आव्हाड यांनी बँक अकाउंट व यूपीआयद्वारे रक्कम पाठवली. साडेसोळा लाख रुपये घेऊन देखील मुलाला नोकरीचे नियुक्तिपत्र मिळत नसल्यामुळे आव्हाड यांनी मस्के यांच्याकडे दिलेल्या रकमेचा तगादा लावला. त्याने दोन लाख २५ हजार रुपये रक्कम आव्हाड यांना परत केली. मात्र १४ लाख २५ हजार रुपये रक्कम देण्यास टाळाटाळ करत प्रत्येकवेळी वेगळ्या सबबी सांगत होता. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आव्हाड यांनी मस्के याच्या विरुद्ध वावी पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहुल निरगुडे तपास करत आहेत.