नाशिक लाईव्ह न्यूज । आर्थिक तणावामुळे एका युवकाने आपल्या जवळच्या मित्राच्याच घरात चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ही घटना नाशिकमधील पखाल रोडवरील गुलशन कॉलनीमध्ये राहणारे अंजुम बिसमिल्ला कुरेशी यांच्या घरी घडली.
मोबाइल हप्ते आणि घरकर्ज फेडण्यासाठी एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या घरातच हात साफ केल्याने नात्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २४ ते २६ मे दरम्यान, घरफोडी करून चोरट्यांनी सोनं-चांदीचे दागिने आणि सुमारे २ लाख रुपयांची रोकड असा एकूण ३८ लाख ५८ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखा युनिट १ आणि २ च्या पथकाने मिळून तात्काळ तपासाला सुरुवात केली. या कारवाईत पोलिसांनी २५ किलोमीटरपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली आणि चोरट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. शेवटी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्र्यंबकेश्वर ते पैठण रोडदरम्यान सापळा रचून चार संशयितांना एका कारमधून अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नावीद अल्ताफ हाशमी, शेहबाज जावेद खान, उत्तम धोंडीराम मुंजे आणि महेश मधुकर व्यवहारे अशी आहेत. चौकशीत आरोपींपैकी एका आरोपीचा संबंध पीडित कुरेशी यांच्याशी असल्याचे समोर आले आहे. त्यानेच घराची माहिती इतर साथीदारांना पुरवली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आणखी कोणाचा यात सहभाग आहे का याचा शोध घेत आहेत. घटनाक्रमावरून घरफोडीसाठी नातेसंबंधाचा गैरवापर कसा होतो, याचे हे ठळक उदाहरण ठरले आहे.