नाशिक लाईव्ह न्यूज । सध्याच्या वित्तीय वर्षाच्या मागणीसह घरपट्टीच्या थकबाकीचा आकडा पावणे सहाशे कोटींवर गेल्याने नाशिक महानगरपालिकेने अखेर थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तब्बल १४ हजार थकबाकीदारांना महापालिकेने जप्तीच्या नोटीसा बजावण्याची तयारी सुरू केली आहे. पंधरा दिवसांत थकबाकी न भरल्यास मिळकतींच्या मालकी हक्कांवर महापालिकेच्या थकबाकीचा बोजा चढविला जाणार आहे.
‘जीएसटी’पाेटी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाखालोखाल घरपट्टीतून मिळणारा महसूल महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. महापालिकेच्या रेकॉर्डवर सुमारे पाच लाख ९२ हजार मिळकतींची नोंद आहे. या मिळकतींवर घरपट्टीची आकारणी केली जाते. कर वसुली विभागाकडे पर्याप्त मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे गेल्या काही वर्षात वेळेत घरपट्टी देयकांचे वाटप होत नाही. त्यात करदाते उदासीन असल्याने घरपट्टीच्या थकबाकीचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यातून करवसुलीसाठी महापालिकेने नियमित करदात्यांसाठी आठ टक्क्यांपर्यंत कर सवलत योजना राबविली.
त्यानंतर थकबाकीदारासाठी अभय योजना राबविली. या योजनेअंतर्गत थकबाकीदारांना दंडाच्या रकमेत ९५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली गेली. त्यानंतरही घरपट्टीच्या थकबाकीचा आकडा ५७९ कोटींपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पहिल्या टप्प्यात सहाही विभागातील प्रत्येकी १०० बड्या थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या. त्यानंतर आता १४ हजार बड्या थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीसा बजावण्यात येत आहेत.
अशी होणार कारवाई
घरपट्टी वसुलीसाठी बड्या थकबाकीदार मिळकतधारकांना १२ दिवस मुदतीची पहिली नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतर पुन्हा १५ दिवसांची अंतिम नोटीस बजावली जाईल. त्यानंतरही प्रतिसाद न देणाऱ्या मिळकतधारकांच्या मिळकती जप्त केल्या जाणार असून मिळकतींच्या मालकी सदरी महापालिकेच्या घरपट्टी थकबाकीचा बोजा चढविला जाणार आहे.