नाशिक लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२५ । नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये गुरुवारी दुपारी विजेच्या उपकरणांमध्ये झालेल्या बिघाडामुळे शॉर्टसर्किट होऊन धुराचे लोट बाहेर पडू लागले. नवजात अर्भकांच्या अतिदक्षता कक्षात घडलेल्या या घटनेमुळे घबराट पसरली. परंतु रुग्णालयातील ५० परिचारिकांनी जिवाची बाजी लावून ७६ नवजात बालकांना सुखरूपपणे वाचवले.
शहर तसेच ग्रामीण भागामधून येणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. तेथे प्रसूती कक्षात नेहमीच गर्दी असते. प्रसूतीनंतर आरोग्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागणाऱ्या बालकांवर उपचार करण्यासाठी ५० क्षमतेचा नवजात बालकांसाठीचा अतिदक्षता कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यात दुपारी विद्युत उपकरणांमध्ये बिघाड झाल्यामुळे अचानक आगीच्या ठिणग्या उडाल्या. कक्षात अल्पावधीत धुराचे लोट पसरू लागल्यामुळे धावपळ उडाली.
या वेळी उपस्थित माता व त्यांच्या नातेवाइकांचाही सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी गोंधळ उडाला. मात्र रुग्णालयातील परिचारिकांनी प्रसंगावधान राखून सर्व बालकांना त्यांच्या नातेवाइकांसह सुरक्षित कक्षामध्ये हलवले. दरम्यान, यापूर्वी भंडारा व नगर येथे सरकारी रुग्णालयांमध्ये आग लागून नवजात बालकांचे झालेले मृत्यू तसेच असे प्रकार घडू नयेत यासाठी राज्य शासनाने सरकारी रुग्णालयांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये नियमावली तयार केल्यानंतरही जिल्हा शासकीय रुग्णालयाशी संबंधित यंत्रणांचा बेजबाबदारपणा उघड झाला.