नाशिक लाईव्ह न्यूज । २३ मे २०२५ । नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला लागली भीषण आग अखेर आटोक्यात आलीय. आगीमुळे होणारा संभाव्य धोका टळला आहे. तब्बल 55 ते 56 तासात आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
दरम्यान आग ज्या गॅस टँक आणि इतर केमिकल टँकपर्यंत जाणार होती. तिथपर्यंत आता आग जाणार नाही. आग पसरु नये, यासाठी टँकच्या जवळील ज्वलनशील कच्चा माल दूर करण्यात आला असल्याची माहिती नाशिक महापालिका अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी प्रदीप बोरसे यांनी दिली आहे.
दरम्यान, इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे अनेक बंब आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र, कंपनीच्या आगीला 56 तास उलटूनदेखील आग नियंत्रणात आलेली नव्हती. फिल्म्स आणि पीव्हीसी मटेरियल हे ज्वलनशील असल्याने ही आग वाढतच असल्याचे सांगितले जात होते.
नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्यांतून अग्निशमन दलाच्या गाड्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. फोम आणि पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. तर आकाशात आगीच्या धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले होते. आगीची तीव्रता वाढतच चालली होती. खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीपासून तीन किमी परिसर निर्मनुष्य म्हणजे गावे खाली करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला.
अखेर 56 तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीमुळे होणारा संभाव्य धोका टळला आहे. आग विझविण्यासाठी लाखो लिटर पाणी आणि लाखो लिटर फोमचा वापर करण्यात आला. आजूबाजूच्या कंपनीमधून पाणी आणून आग आटोक्यात आणण्यात आली. कंपनीमधील सर्व टँक आता सुरक्षित आहेत, असे अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी प्रदीप बोरसे म्हटले आहे.