नाशिक लाईव्ह न्यूज । १५ मे २०२५ । रस्ते अपघाताच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे आज पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास भीषण अपघात झालाय. ज्यामध्ये देव दर्शन करून घरी परत येताना बाप-लेकाचा अपघातात मृत्यू झाला. किशोर ओंकार सोनवणे (वय ४०), त्यांचा मुलगा ऋतिक किशोर सोनवणे (वय ११) असं मृतांची नाव असून या घटनेने मनमाड आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेबाबत असे की, येवला तालुक्यातील नगरसुल येथील वडाचा मळा परिसरातील किशोर सोनवणे हे मुलगा ऋतिक आणि पुतण्या रवींद्र बाळू सोनवणे (वय २७) सह दुचाकी(एमएच १५ डीएफ ५२११)ने देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतत असताना मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मागून येणाऱ्या पिकअप गाडीने (एमएच १५ जीके ४३१२) त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, किशोर आणि ऋतिक यांचा जागीच मृत्यू झाला. तर रवींद्र गंभीर जखमी झाला. जखमी रवींद्रवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर पिकअप चालकाने मोटारसायकलला जवळपास चार किलोमीटरपर्यंत ओढत नेले. मालेगाव चौफुलीवर वाहतूक पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून पिकअप ताब्यात घेतली, मात्र चालक फरार झाला. या घटनेने संतप्त झालेल्या स्थानिकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. मनमाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघाताचा गुन्हा मनमाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे. पोलिसांनी पिकअप जप्त केली असून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात शोककळा पसरली असून, पोलिसांनी तपासाला गती द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.