जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असून यातच नाशिक जिल्ह्यात तणनाशकाच्या चुकीच्या फवारणीमुळे शंभर एकरांहून अधिक क्षेत्रातील कांदा पिकाचे संपूर्ण नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्याचे मोठं आर्थिक नुकसान झाले होते. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अखेर प्रति एकर 40 हजाराची नुकसान भरपाई मिळाली. त्यामुळे अंशतः का होईना, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
विठेवाडी आणि आसपासच्या गावांमध्ये तणनाशक फवारणीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. उन्हाळी कांद्याच्या लागवडीवर फवारणी केल्यानंतर संपूर्ण पीक करपले. घटनेनंतर तातडीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि भरपाईसाठी प्रयत्न सुरू केले.
मिळालेल्या भरपाईमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान भरून निघणार नसले, तरीही ही आर्थिक मदत थोडासा आधार देणारी आहे. ही भरपाई केवळ आयपीएल कंपनीच्या तणनाशकामुळे झालेल्या नुकसानीसाठी दिली गेली आहे. मात्र, सिन्नर, निफाड आणि येवला तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना प्रयत्नशील आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.
या प्रयत्नांतर्गत कळवण, देवळा आणि सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रति एकर 40 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार राहुल आहेर, आमदार नितीन पवार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या उपस्थितीत या भरपाईचा वितरण कार्यक्रम पार पडला.