नाशिक लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२५ । नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर व डिसेंबर 2024 या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर बाधित शेतकरी यांची नावे, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व इतर माहिती अपलोड करण्यात येत आहे.
या अनुषंगाने ज्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले आहे.
प्रशासनामार्फत जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर व डिसेंबर 2024 या कालावधीत झालेल्या शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसिल कार्यालयामार्फत सर्व तलाठी कार्यालये व बाधित ग्रामपंचयात कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
ज्या बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी तसेच बँक खाते आधार कार्डसोबत संलग्न केले आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनामार्फत नुकसानीची रक्कम जमा करण्यात आली आहे, असे श्री. वाघ यांनी कळविले आहे.