नाशिक लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२५ । कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. ती म्हणजेच कांद्याच्या दरात घसरण होत असून आठवड्याभरात ७०० ते ८०० रुपयांची घसरण झाल्यामुळे कांद्याचे सरासरी दर २२०० रुपयांवर खाली घसरले आहेत.
नाशिकच्या कांद्याला गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मोठी मागणी असल्याने कांद्याचे सरासरी दर हे ३ हजार ते ३ हजार १०० रुपयांवर पोहचले होते. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीसह पुणे बाजार समितीमध्ये देखील कांद्याला विक्रमी भाव मिळाला होता. कांद्याचा चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यामुळे अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी आणू लागले होते. दरम्यान अन्य राज्यातील कांदा देशांतर्गत पोहचू शकत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील कांद्याला चांगला भाव मिळत असताना गेल्या आठवड्यापासून कांद्याचे दर घसरले आहेत.
नाशिकच्या लासलगावसह मनमाड बाजार समितीत कांद्याला सरासरी २ हजार २०० ते २ हजार ३०० रुपये दर सध्या मिळत आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात ७०० ते ८०० रुपयांनी घट झाली आहे. तर आवक सुद्धा वाढली असून अन्य राज्यातील कांदा देशावर पोहचत असल्याने कांद्याच्या दर कमी झाले असले तरी होळीपर्यंत सध्या जे दर आहे ते तसेच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. भाव घसरल्याने काही शेतकऱ्यांनी कांदा विक्री थांबविली आहे.