---Advertisement---

जीबीएस आजाराची नाशिक जिल्ह्यात एन्ट्री ; ‘या’ ठिकाणी आढळला रुग्ण

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२५ । राज्यातील काही ठिकाणी सध्या जीबीएस या व्हायरसने धुमाकूळ घातला असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता या जीबीएस आजाराने नाशिक जिल्ह्यात एन्ट्री केली आहे. इगतपुरी तालुक्यातील एका आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्यात जीबीएससदृश आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे या रुग्णास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णाचे नमुने तसेच आश्रमशाळेतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

जीबीएस संशयित रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. याबाबत मंगळवारी (दि. २५) जिल्हाधिकारी कार्यालयात माता व बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत जिल्हा टास्क फोर्स समितीची सभा जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत खबरदारी बाळगण्याच्या सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी दिल्या. तसेच सदर आजाराबाबत शासनाच्या निर्देशाप्रमाणे उपाययोजना करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले.

राज्यात पुण्यापाठोपाठ नांदेड, जळगाव, नंदुरबार येथे ‘जीबीएस’चे रुग्ण आढळले आहेत. त्यातच या आजारामुळे काहींचा मृत्यू झाल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र बागूल यांनी सांगितले. बैठकीत पंधराव्या वित्त आयोगअंतर्गत आरोग्य केंद्रांच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला. तसेच राष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत इन्फ्ल्युएंझा, डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया आजारांचा तसेच कॉलरा, गॅस्ट्रोसारख्या आजारांचा मागील तीन वर्षांचा आढावा झाला.

अधिकार्‍यांना नोटिसा
गरोदर माता आणि बालकांच्या लसीकरणाबाबत येवला आणि निफाड या तालुक्यांच्या संबंधित अधिकार्‍यांनी अद्ययावत माहिती सादर न केल्याने संबंधितांना नोटिसा बजावण्याचे आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गुंडे यांनी यावेळी दिले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---