नाशिक लाईव्ह न्यूज । गृहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेज तूरडाळीसह चणाडाळ, उडीद डाळीच्या दरात घसरण झाली आहे. यंदाच्या हंगामात उत्पादनात वाढ झाल्याने गेल्या दोन महिन्यांत तूरडाळीच्या दरात किलोमागे ५० ते ६० रुपयांनी घट झाली आहे. तूरडाळीसह चणाडाळीच्या दरात १५ ते २० रुपये, तसेच उडीद डाळीच्या दरात पाच ते सात रुपयांनी घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.
खरंतर गेल्या वर्षीच्या जून-जुलै महिन्यांत तूर डाळीचे दर कडाडले होते. त्या वेळी घाऊक बाजारात एक किलो तूर डाळीला १७५ ते १८० रुपये किलो हा उच्चांकी दर मिळाला होता. मात्र सध्या कर्नाटकातील तूरडाळीचा हंगाम सुरू झाला असून, मार्केट यार्डातील भुसार बाजारात सध्या आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गेल्या दोन महिन्यांत तूरडाळीच्या दरांत प्रतिकिलोमागे ५० ते ६० रुपयांनी घट झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि गुजरातमधील तूरडाळीचा हंगाम सुरू झाला आहे. आवक वाढल्याने दरात घट झाली आहे.
सध्या घाऊक बाजारात तूर डाळीचे प्रतिकिलोचे दर प्रतवारीनुसार १०७ ते १३० रुपये किलो दरम्यान आहेत. यंदाच्या हंगामात तूर डाळीचे उत्पादन ४४ लाख टन होण्याची शक्यता आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दररोज ८० ते १०० टन तूर डाळीची आवक होत आहे. येत्या काही दिवसात तूर डाळीच्या दरांत आणखी घट होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे सध्या तुरीच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. २०२४ मध्ये एप्रिलपासून तुरीच्या दरात सुधारणा झाली होती. आठ ते नऊ हजार रूपये क्विंटलची तूर नोव्हेंबर महिन्यात १२ हजार रूपये क्विंटलपर्यंत पोहचली होती. मात्र डिसेंबर महिन्याच्या अखेरीपासून दरात घसरण दिसून येत आहे. १२००० हजार रुपायांवर असलेली तुरीचा दर आता ६५०० ते ७३०० रुपयापर्यंत पोहोचले आहे