नाशिक लाईव्ह न्यूज । एका नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून जीवन संपविल्याची दुर्देची घटना नाशिकच्या देवळामधील इंदिरानगर घडली. अंबिका मयुर पवार (वय १९, रा. इंदिरानगर, देवळा) असं मयत विवाहितेचं नाव असून याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी वारंवार मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
देवळा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, अंबिका मयुर पवार (वय १९, रा. इंदिरानगर, देवळा) हिच्यावर पती मयुर अंबादास पवार, सासू निर्मला अंबादास पवार, सासरे अंबादास पंडित पवार आणि नणंद पिंकी अंबादास पवार यांनी दुचाकी घेण्यासाठी माहेरहून वीस हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता. पैसे न मिळाल्याने तिला वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करण्यात येत होती.
त्रासाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
सासरच्या मंडळींनी सोमवार, ३१ मार्च २०२५ रोजी अंबिकाला मारहाण करून घरातून हाकलून दिले होते. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून अंबिका शेजारी राहणाऱ्या आपल्या आईकडे गेली. त्यानंतर मंगळवार (दि.1) रोजी सायंकाळी 7 वाजता तिने आईच्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. आई सखुबाई हिने मुलीला या अवस्थेत पाहताच दरवाजा तोडून अंबिकाला तातडीने खाली उतरविण्यात आले त्यानंतर उपचारासाठी सटाणा येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने तिला नाशिक येथे हलवण्यात येत असतानाच वाटेतच तिचा दुर्देवी मृत्यू झाला.
या प्रकरणी फिर्यादी शंकर वसंत पवार (वय 32, रा. इंदिरा नगर, देवळा) यांच्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे पुढील तपास करीत आहेत.