नाशिक लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२५ । सध्या राज्यात एप्रिलमध्येच ‘मे हिट’चा तडाखा जाणवत असून उन्हाच्या तडाख्यामुळे अनेक धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. यातच वाढत्या उन्हामुळे नाशिक जिल्ह्यातील देखील धरणांचा पाणीसाठा कमी होत असून, जिल्ह्यातील धरणसमुहात एकूण ३६.२८ टक्के साठा शिल्लक आहे. गंगापूर धरणात गेल्या वर्षीपेक्षा १६ टक्के जास्त पाणीसाठा असून, ५८.६३ टक्के पाणी त्यात शिल्लक आहे.
नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणात सद्यस्थितीत ५२.५९ टक्के पाणी शिल्लक असून, गेल्या दहा दिवसात त्यात ४ टक्के घट झाली आहे. २० दिवसांपूर्वी गंगापूर धरणात ६०.६३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षी १५ एप्रिल रोजी गंगापूर धरणात ४२.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मात्र गतवर्षीपेक्षा पाणीसाठा जास्त असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. गंगापूर धरणसमुहात यंदा ५२.५९ टक्के पाणी असून, मागील वर्षी हाच साठा ३८.८८ टक्के इतका होता. जिल्ह्यातील धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत नेत यंदा अधिक पाणीसाठा असल्याने अद्याप पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली नाही. मागील दोन वर्षात जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सुमारे ३९९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला
सात विहिरी अधिग्रहित
जिल्ह्यात सध्या ८ शासकीय आणि १६ खासगी टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याची आवश्यकता भागविण्यासाठी प्रशासनाने मालेगावात ५ आणि पेठ, सुरगाणा तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे सात विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. या टँकरच्या माध्यमातून ३४ फेऱ्या केल्या जात आहेत.
टँकरच्या मागणीत वाढ
जिल्ह्यात एप्रिलच्या मध्यात पाणी टंचाईची समस्या तीव्र होत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून इगतपुरी, मालेगाव, चांदवड, पेठ, सुरगाणा, सिन्नर, येवला अशा एकूण सात तालुक्यांतील २२ गावे व ३५ वाड्यांवर २४ टँकरच्या सहाय्याने ३४ फेऱ्यांना सुरुवात करण्यात आली आहे. यात ८ शासकीय टँकरद्वारे, तर १६ खासगी टँकरचा वापर करीत पाणी पुरवठा करत ग्रामीण भागाची तहान भागविण्यात येत आहे. येवला तालुक्यातील १२ गावे व ११ वाड्यांवर ९ टँकरद्वारे १२ फेऱ्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे. त्याखालोखाल मालेगाव तालुक्यातील १५ गावात ५ टैंकरच्या १२ फेऱ्यांमधून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.