नाशिक लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२५ । नाशिकमध्ये गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शहरात किरकोळ कारणांमधून हाणामारी होते आणि तो भडका खुनापर्यंत जातो हे सत्र सुरू आहे. यातच सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडियमजवळ धक्कादायक प्रकार घडला. ज्यात ग्राहकाने सिगारेट मागितल्यानंतर एक रुपयाच्या फरकामुळे झालेल्या वादात टपरी चालकाने ग्राहकास मारहाण केली. यानंतर उपचारादरम्यान त्या ग्राहकाचा मृत्यू झाला. विशाल भालेराव (५०,पाथर्डी फाटा) असं मयताचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी टपरी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
या घटनेबाबत असे की, सिडकोमधील छत्रपती संभाजी स्टेडियम जवळ असलेल्या एका पान दुकानामध्ये मयत विशाल भालेराव हे सिगारेट घेण्यासाठी गेले असता टपरी चालक बापू जगन्नाथ सोनवणे (५९, शिवपुरी चौक) याने सिगारेटचे अकरा रुपये मागितले परंतू मयत विशाल भालेराव याने ही सिगारेट दहा रुपयांना मिळते तुम्ही अकरा रुपयाला का विकता? असा जाब विचारल्याने त्यांच्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली, यात त्यांच्यात झालेल्या वादात टपरी चालक संशयित बापू सोनवणे याने विशालच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण केली.
यात जखमी झालेला भालेराव हा ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या मालकाच्या लक्षात आले की डोक्यातून रक्तस्त्राव होतं आहे. त्याला खासगी रुग्णालयात नेवून त्याच्यावर उपचार केले. यानंतर भालेराव घरी गेल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्यास अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याची प्राथमिक तपासणी करून त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. शासकीय रुग्णालयात त्यास उपाचारासाठी नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
याबाबत अंबड पोलिसात प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यानंतर याबाबत सविस्तर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या वतीने देण्यात आली आहे. अंबड पोलिसांनी टपरी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.