नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक मधील देवळा तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला असून यातच कणकापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे पशु पालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील पश्चिम भागातील कणकापूर,खर्डे,वडाळा,शेरी व वार्षि या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून सोमवारी दि. १७ रोजी रात्रीच्या सुमारास कणकापूर कांचने रस्त्यावर शेतकरी पोपट भवरे यांच्या मळ्यात असलेल्या जनावरांपैकी एका गायीवर बिबट्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात गाय गंभीर जखमी झाली आहे. हा प्रकार शेतकरी भवरे यांच्या सकाळी उठल्यावर लक्षात येताच त्यांनी सदरच्या घटनेची माहिती वनविभागाला कळवली. घटनास्थळी वनपाल डी. पी गवळी यांनी भेट दिली व जखमी जनावरावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घेण्याचा सल्ला दिला.
खर्डे व परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली असून, त्याच बरोबर गहू, मका आदी पिके पण उभी आहेत. हा सर्व परिसर डोंगराळ भागात असल्याने याठिकाणी बिबट्यांचे दर्शन नित्याचेच झाले आहे. यामुळे शेत शिवारात राहणाऱ्या पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.