---Advertisement---

आता होणार थेट कडक कारवाई ; प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांबाबत मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा..

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । राज्याच्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांच्या विषयी महत्वाची घोषणा केली. प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यास सरसकट परवानगी दिली जाणार नाही, असे सांगताना आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांची परवानगी रद्द अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत केली.

नियमांचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी स्थानिक पोलिस निरीक्षकांची असेल, या जबाबदारीचे पालन न केल्यास पोलिस निरीक्षकावरदेखील कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली.

भाजपच्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील आमदार देवयानी फरांदे यांनी प्रार्थना स्थळांवरील बेकायदेशीर भोंग्यांबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. नाशिकमधील अलीकडेच घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करून त्यांनी अनेकांसाठी त्रासदायक ठरणारे, ध्वनिप्रदूषण करणारे हे भोंगे हवेतच कशाला, असा प्रश्न केला. उत्तर प्रदेश सरकारने ज्याप्रकारे भोंग्यांवर कारवाई केली आहे, त्या धर्तीवर महाराष्ट्रातही भोंग्यांवर कारवाई करणार का, असा सवाल आ. फरांदे यांनी उपस्थित केला होता.

त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांवर कारवाईचे निर्देश दिले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थना स्थळावर भोंगे लावण्याआधी परवानगी घेतली पाहिजे. रात्री १० पासून सकाळी ६ पर्यंत भोंगे बंद असले पाहिजेत. सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४४ डेसिबलची आवाज मर्यादा असली पाहिजे. कायद्यानुसार अधिक डेसिबलने भोंगे वाजत असतील, तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत. निश्चित कालावधीकरिताच भोंगे लावता येतील. त्यानंतर पुन्हा भोंगे लावायचे असल्यास संबंधितांनी पुन्हा पोलिसांकडून परवानगी घ्यावी. ज्या ठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होईल, त्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही. जर पोलिस निरीक्षकांनी याचे तंतोतंत पालन केले नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांनी लक्षवेधीस उत्तर देताना स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---