नाशिक लाईव्ह न्यूज । पतीच्या निधनानंतर पत्नीने सासरच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागितल्याच्या वादातून सासू-सुनेमध्ये तुफान हाणामारी झाली. विशेष ही घटना चक्क न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच घडली.अखेर पोलिसांनाच या वादात उडी घेत, दोघींवर कारवाई करावी लागली आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका महिलेच्या पतीचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. तिने न्यायालयात सासऱ्याच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मिळावा यासाठी केस दाखल केली आहे. मात्र सासरकडील मंडळी हिस्सा देण्यास तयार होत नसल्याने महिलेच्या नातेवाइकांमध्ये वाद सुरू होता. याप्रकरणात दुसऱ्या तारखेसाठी जेव्हा सासू आणि सुन न्यायालयात आले, तेव्हा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच त्यांच्यात बाचाबाची झाली.
सासू यमूना यशवंत निकम (५८, पिंपळपट्टी, मोरे मळा, जेलरोड) आणि सुनेचा भाऊ दीपक हिरामण साळवे (३७, रा. धुळगाव, त्र्यंबकरोड, महिरावणी) यांच्यात शाब्दीक चकमक झाली. बघता बघता, वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. दोन्ही गटाकडून महिला आणि पुरुष भिडले. उपस्थितांनी यावेळी मध्यस्थी करण्याचा देखील प्रयत्न केला.
मात्र, दोन्ही गट इतके आक्रमक होते की, मध्यस्थी करणाऱ्यांना देखील ते जुमानत नसल्याचे दिसून आले. अखेर सरकारवाडा पोलिसांनी धाव घेत, दोन्ही गटांना पोलिस ठाण्यात हजर केले. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच संबंधितांना मेडिकल मेमो देण्यात आले. दरम्यान, न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच अशाप्रकारे फ्री स्टाईल हाणामारीचा प्रकार घडल्याने, न्यायालय आवारात दिवसभर एकच चर्चा रंगली होती.