नाशिक लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२५ । नाशिक शहरात किमान तापमानात घसरण होत असतांनाच अचानक वाढ झाली. शहरात किमान २१.२ तर कमाल ३६.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. आगामी तीन दिवस हवामान कोरडे राहाणार असल्याने किमान अन कमाल तापमानात हळुहळु वाढ होण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे. मात्र यातच बुधवारपासून उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसापासून तापमानात बदल पाहायला मिळालं. सध्या दिवसाचे तापमान ३६ अंशावर गेले आहे. यामुळे दिवसा उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे. मात्र काही दिवसापासून रात्रीचे तापमान २० अंशाखाली असल्याने काहीसा गारवा जाणवत होते. मात्र आता रात्रीचे देखील तापमान २० अंशावर गेल्याने उकाडा जाणवत आहे. एकाच दिवशी रविवारी किमान तापमानात ४ अंशाने वाढ झाली.
दरम्यान एकीकडे नाशिकसह राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असताना यातच हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. आज विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटेचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. तर बुधवारपासून विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेषतः उत्तर महाराष्ट्रात बुधवारपासून विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नाशिकमध्येही अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता असून यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढणार आहे.