नाशिक लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२५ । शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्याने अनेक जण बाहेर गावी जाण्याचा प्लॅन करतात. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी दिसून येते. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता अतिरिक्त गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर करमळी / तिरुअनंतपुरम, पुणे-नागपूर आणि दौंड-कलबुर्गीदरम्यान विशेष उन्हाळी रेल्वे गाड्यांच्या ३३२ फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील काही गाड्या या नाशिकमार्गे धावणार असल्याने नाशिककरांची सोय होणार आहे.
या उन्हाळी विशेष गाड्यांमध्ये सीएसएमटी-नागपूर, सीएसएमटी-करमाळी आणि एलटीटी-करमाळी या प्रमुख मार्गांवरील गाड्यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा उन्हाळ्यातील प्रवास अधिक आरामदायक आणि सोयीस्कर होणार आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण २४ मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरु होईल, अनारक्षित डब्ळ्यांसाठी तिकिटे यूटीएस अॅपद्वारे बुक करता येतील. तपशीलवार वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती www.enquiry.indianrail.gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जादा गाड्यांचा तपशील असा
१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर द्विसाप्ताहिक विशेष गाडी : रेल्वे क्रमांक ०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ६ एप्रिल ते २९ जून पर्यंत दर मंगळवार आणि रविवारी ००.२० वाजता सुटेल. नागपूर येथे त्याच दिवशी १५:३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात हीच गाडी क्रमांक ०२१४०६ एप्रिल ते २९ जून पर्यंत दर मंगळवार आणि रविवारी २०:०० वाजता नागपूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३:३० वाजता पोहोचेल.
२) पुणे नागपूर पुणे साप्ताहिक अतिजलद वातानुकूलित विशेष : ०१४६९ साप्ताहिक अति जलद वातानुकूलित विशेष ८ एप्रिल ते २४ जून पर्यंत पुणे येथून दर मंगळवारी १५.५० वाजता पुण्याहून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात क्रमांक ०१४७० गाडी ९ एप्रिल ते २५ जून नागपूर येथून दर बुधवारी ८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी २३:३० वाजता पोहोचेल.
३) पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक अतिजलद विशेष रेल्वे क्रमांक ०१४६७साप्ताहिक अतिजलद विशेष ९ एप्रिल २०२५ ते २५ जून २०२५ पर्यंत दर बुधवारी पुणे येथून १५.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल तर परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक ०१४६८ ही गाडी १० एप्रिल २०२५ ते २६ जून २०२५ पर्यंत दर गुरुवारी नागपूर येथून सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री २३:३० वाजता पोहोचेल.