नाशिक लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२५ । नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत डीजे सुरू असताना नितीन रणशिंगे (वय २३) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तरुणाचा डीजेच्या आवाजामुळे झाला की अन्य कोणत्या कारणामुळे याबाबत चर्चा होती. अशातच नितीन रणशिंगे या तरुणाच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं आहे.
नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या महात्मा फुले नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने डीजे लावण्यात आला होता. मात्र, डीजेच्या आवाजाने नितीन रणशिंगे याला त्रास झाल्यानं त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येऊ लागले. त्यानंतर त्याला तात्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.
डीजेच्या आवाजाने नितीन रणशिंगे याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, पंचवटी पोलिसांनी अधिक तपास करून गेल्या चार वर्षांपासून गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या नितीनचा मृत्यू झाल्याचा पोलीस तपासात समोर आलं आहे. नाशिकच्या एका खासगी रुग्णालयामध्ये नितीनवर गेल्या चार वर्षांपासून उपचार सुरू होते. मात्र, तो सध्या नाशिकमध्ये त्याच्या घरी असताना त्याला अधिकचा त्रास होऊ लागला, आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे.