नाशिक लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२५ । नाशिक : नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये नोकर भरतीची जाहिरात काढण्यात आली होती. यासाठी परीक्षा देखील घेण्यात आली. मात्र या परीक्षेत पवई केंद्रावर डमी उमेदवार बसवून परीक्षा पास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बिहारमधील सात जणांविरोधात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. रवी रंजन कुमार, संदीप कुमार, शिशुपाल कुमार, आयुष राज, राजीव सिंग, संदीप कुमार, आणि आशुतोष कुमार या असं गुन्हा दाखल केलेल्या सात जणांचे नावी आहेत. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक येथील करन्सी नोट प्रेसमध्ये कनिष्ठ टेक्निशियन आणि पर्यवेक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया निघाली होती. यासाठीची जाहिरात देखील निघाली होती. त्यानुसार भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार १३ मार्च २०२२ ते ४ मार्च २०२३ अशी दोन टप्प्यात परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत सात आरोपींनी कटकारस्थान करून परीक्षेसाठी डमी उमेदवार दिले होते.
दरम्यान सदरच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर या परीक्षार्थीनी बनावट आयटीआय संस्थेचे प्रमाणपत्र तसेच इलेक्ट्रीकल, डिप्लोमाचे प्रमाणपत्र आणि बनावट कागदपत्र सादर करून नोकरी देखील मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली हा गुन्हा झिरोने पवई पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी मूळचे बिहारचे रहिवासी असून त्यांचा सध्या शोध सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.