नाशिक लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२५ । देशभरात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला असून सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचेचे प्रमाणात वाढले आहे. अशातच नाशिकमधून खळबळ उडवून देणारी बातमी समोर आलीय. नाशिकच्या आर्टिलरी सेंटरच्या 15 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सीबीआयच्या (CBI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) वतीने जवानांचे बिल पास करण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या ऑडीटर, अकाऊंट, क्लार्क आशा 15 अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या 11 प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोव्हेंबर 2024 मध्ये आर्टिलरी सेंटरच्या अधिकाऱ्यांची आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयातून चौकशी केली होती. भ्रष्टाचारासह लाचखोरीच्या तक्रारी सीबीआयकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत सीबीआयचे विभागीय पथक नाशिकमध्ये दाखल झाले होते.
आता नाशिकच्या आर्टिलरी सेंटरच्या 15 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑडीटर, अकाऊंट, क्लार्क आशा 15 अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. याशिवाय, लाचखोरीसाठी वापरलेली बँक खाती आणि त्यातील व्यवहारांची माहितीही सीबीआयने तपासात उघड केली.या कारवाईत व्हॉट्सअॅप चॅट्स, लाच मागणीचे संदेश आणि बँक व्यवहारांचे पुरावे हाती लागले.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली हे गुन्हे दाखल झाले आहेत. या कारवाईने संरक्षण यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. सीबीआयचा तपास सुरू असून, याप्रकरणी आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.