नाशिक लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । नाशिकच्या माळेगावातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. अज्ञात सहा जणांनी दोन दुचाकीवर हत्यारांसह येत एका व्यापाऱ्याला २५ लाखांना लूटल्याची घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नाशिकच्या मालेगाव शहरातील मुंबई- आग्रा महामार्गावर टेहरे गावाजवळ सदरची घटना रात्रीच्या सुमारास घडली. किराणा व्यावसायिक मनोज चांदमल मुथा हे रात्रीच्या सुमारास आपले किराणा दुकान बंद करुन दुकानातील रक्कम घेऊन रात्री घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्यावर काही जणांची नजर होती. त्यानुसार कारच्या मागे दुचाकी लागत पाठलाग करून संधी मिळताच या अज्ञातांनी गाडीवर हल्ला चढविला.
मालेगाव बाजूकडे येणारा रोडवर स्पीड ब्रेकर जवळ त्यांनी त्यांची गाडी हळू केली असता मागून एका दुचाकीवरून धारधार हत्यारांसह अज्ञात साधारण 25 ते 30 वयोगटातील तीन जण येऊन तू आम्हाला कट मारला अशी कुरापत काढत त्यांना शिविगाळ करत दोघांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर पाठीमागून आलेल्या अन्य दुचाकीस्वारांनी त्यांच्या गाडीची काच फोडत गाडीतील रोख रक्कम पंचवीस लाख रुपये घेऊन पोबारा केला.
पोलिसात गुन्हा दाखल
अचानक घडलेल्या घटनेने व्यापारी मुथा हे घाबरले होते. या घटनेबाबत मुथा यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तर या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.