नाशिक लाईव्ह न्यूज । अंबड आयमा हाउस येथे असलेल्या पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी १२ तासांच्या आत जेरबंद केले. पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २८) रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान संशयित नितीन रामलाल पवार (२९, रा. जाधव संकुल, अंबड) याने आयमा हाउस, अंबड एमआयडीसीजवळील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम तोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तत्काळ बँकेचे मॅनेजर यांना अलर्ट गेल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. एमआयडीसी चुंचाळे पोलिस चौकीचे अमलदार महेश सावळे, मच्छिंद्र दिवे यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. घटनेत जोराने अलार्म वाजू लागल्याने भेदरलेला संशयित अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. मात्र, पोलिस कर्मचारी किरण सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयितास गुन्हे शोधपथकाने एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. सहायक आयुक्त शेखर देशमुख, प्रभारी निरीक्षक मनोहर कारंडे व अधिकाऱ्यांचे पथक अधिक तपास करत आहेत
१८ लाख चोरणारे मोकाटच
एक्सलो पॉइंटजवळील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने तोडून १८ लाख ७६ हजार रुपयांची रोकड लंपास करणारे चोरटे २२ मेपासून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. सहा दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती चोरटे लागले नसल्याचे दिसून येते.