नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमध्ये गुन्हेगारी डोकं वर काढत असून त्यातच चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच विनयनगर पोलिस चौकीपासून १०० मीटरवर वडाळा-पाथर्डी रस्त्यालगतच असलेले एटीएम रोकडसह चोरट्यांनी चारचाकीतून लंपास केला. अज्ञात चोरट्यांनी भरवस्तीतील हे एटीएमच चोरून नेल्यानं खळबळ उडाली आहे. या एटीएममध्ये २६ हजार ५०० रुपये होते. मात्र मशिनची किंमत १५ लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत मुंबईनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनयनगरला मुख्य रस्त्यालगत असलेल्या एटीएम सेंटमधील मशिनच चोरट्यांनी चारचाकी वाहनात टाकून फरार झाल्याचे महटले आहे. या चोरट्यांनी एटीएम कक्षात असलेल्या एकमेव सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रेद्वारे काळे फासले. यानंतर तोंड बांधून आत प्रवेश करत एटीएमचा बॉक्सच उचलून नेला आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजता लगतच्या सलूनचालकाला ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना कळवले.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत तपास सुरू केला. या एटीएमसमोरून द्वारका तसेच पाथर्डी अशा दोन्ही दिशेला जाणाऱ्या रस्त्यावर तपास सुरू करत विविध दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. महामार्गापर्यंत माग विनयनगरपासून महामार्गाकडे येण्यासाठी चार ते पाच रस्ते आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांकडून सकाळपासून या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. मुंबई महामार्गाकडे जाणारे छोटे मालवाहू वाहन जाताना दिसले आहे. परंतु, पुढे महामार्ग असल्याने ते नेमके कोणत्या दिशेला गेले याचा तपास रात्री उशिरापर्यंत सुरू होता.