नाशिक लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२५ । राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया सन 2025-26 अंतर्गत सोयाबीन, भुईमूग व कारळा या पिकांसाठी नाशिक जिल्ह्याची निवड केली आहे. या योजनेत पिकनिहाय मूल्यसाखळी भागीदार (VCP) यांच्या मार्फत जिल्हा कार्यक्षेत्रात समूहामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी शेतीशाळा इत्यादी घटक राबवयाचे असून यासाठी निकष पूर्तता करणारे शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी संस्था यांनी 21 एप्रिल 2025 पर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशिद यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी संस्थांसाठी पात्रतेचे निकष
कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणी केलेली असावी.
ज्या जिल्ह्यात समुह तयार झाला आहे तेथे काम करण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव असावा, म्हणजेचे नोंदणी मार्च 2022 पूर्वीची असावी.
किमान 200 शेतकरी उत्पादक कंपनी (FPCs) किंवा सहकारी संस्थेमध्ये नोंदणीकृत असावेत.
सहकारी संस्था असल्यास संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये तेलबिया पिकांत कामकाजाबाबत नमूद असावे.
मागील ३ वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल 9 लाख रूपयांपेक्षा जास्त असावी.
शेतकरी उत्पादक कंपनी (FPCs) मध्ये शेतकऱ्यांचा किमान 3 लाख रूपयांचा सहभाग असावा.
शेतकरी उत्पादक कंपनी/ सहकारी संस्था प्राधान्याने कमी उत्पादकता असणाऱ्या तालुक्यांमध्ये कार्यरत असावी.
सरकारकडून अनुदान प्राप्तकर्ऱ्या शेतकरी उत्पादक संघाला प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्जाचा नमुना संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नाशिक अग्निशमन केंद्राजवळ, शिंगाडा तलाव, गडकरी चौक नाशिक कार्यालयात, दूरध्वनी क्रमांक 0253-2504042 किंवा [email protected] या इमेवर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.