नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक शहरातील नागरिकांना मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी थकबाकीदार मिळकतधारकांना एक महत्वाची सूचना दिली आहे. थकबाकीदारांनी वेळेत घरपट्टी व पाणीपट्टी भरावी, अन्यथा त्यांच्या चलत अथवा स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ही सूचना नाशिक महानगरपालिका हद्दीतील नागरिकांसाठी विशेष महत्त्वाची आहे.
नाशिक महापालिकेच्या थकीत घरपट्टीची रक्कम सुमारे पाचशे कोटी रुपयांवर गेली असून, मार्चअखेर म्हणजे अवघ्या दोन महिन्यांत ही रक्कम वसूल करण्याचे मोठे आव्हान असल्याने महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदार करदात्यांसाठी एक विशेष योजना राबविली आहे. या योजनेंतर्गत, थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरण्यासाठी शास्ती व इतर फीमध्ये मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाणार आहे. माहे ऑक्टोबर ते माहे डिसेंबर २०२४ करीता ९५ टक्के तर माहे जानेवारी २०२५ करीता ८५ टक्के सवलत देण्यात येईल. या योजनेचा लाभ आतापर्यंत ४१०४६ मिळकतधारकांनी घेतला आहे.
करदात्यांच्या सोईसाठी, नाशिक महानगरपालिकेने सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व विभागीय कार्यालये व उपकार्यालयातील नागरी सुविधा केंद्रे नियमितपणे कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी थकबाकीदार करदात्यांना आवाहन केले आहे की ही सवलतीची शेवटची संधी घेतली पाहिजे, अन्यथा सवलतीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर अधिनियमातील तरतुदीनुसार जप्तीची कारवाई करण्यात येईल.