नाशिक लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२५ । नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून इंडिगो कंपनीने शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचे उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले आहे. सुमारे ७० आंतरराष्ट्रीय शहरांना नाशिकला जोडण्यात आले आहे. यापूर्वी नाशिकमधून ३८ आंतरराष्ट्रीय शहरांसाठी कनेक्टिंग फ्लाइट उपलब्ध होत्या. ही संख्या आता जवळपास दुप्पटीने वाढली आहे.नव्याने जोडल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय शहरांत बहरीन, बोस्टन, इस्तांबूल, ताश्कंद आदी शहरांचा समावेश आहे.
सध्या मुंबईहून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांना आता नाशिक विमानतळावरूनच थेट हैदराबादमार्गे चार तास पन्नास मिनिटांत पोहोचता येणार. यापैकी बहुतांश विमानांची उड्डाणे दररोज उपलब्ध असल्याने ती नाशिककर प्रवाशांसाठी उपयुक्त ठरतील. ओझर विमानतळावरून सध्या इंडिगोकडून दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, इंदूर, गोवा याठिकाणी नियमित विमानसेवा दिली जात आहे. नाशिक-नागपूर ही विमानसेवा सुरू होती. मात्र, नागपुरमधील विमानतळाचे काम सुरू असल्याने ही सेवा तूर्त बंद केली आहे.
दरम्यान, या शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता हॉपिंग फ्लाइटने देश-विदेशातील शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचे कंपनीच्या वतीने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ३० मार्च ते २५ आॅक्टोबरपर्यंत हे वेळापत्रक लागू असेल. या वेळापत्रकानुसार नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरू या विमानतळांवरून बेळगाव, चंडीगढ, दरभंगा, कोझीकोड, डेहराडून, जबलपूर, गया, पंचनगर, विजयवाडा, विशाखापट्टणम, मदुराई आदी शहरांसाठी ‘कनेक्टिंग’ विमानसेवेचा लाभ नाशिककरांना घेता येणार आहे.
काही वेळा विमान बदलून तर काही वेळा विमान न बदलता संबंधित शहर गाठता येणार आहे. विशेषत: धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले तिरुपती शहर आता नाशिकहून अवघ्या चार तासांत गाठता येणार आहे. नाशिक येथून दररोज दुपारी १२.२५ वाजता विमानाचे उड्डाण होणार असून ते व्हाया हैदराबाद दुपारी ४.१० वाजता तिरुपतीला पोहोचणार आहे. दुपारी ११.५५ वाजता विमान परतीला निघणार असून ते सायंकाळी ४.५० वाजता नाशिकला पोहोचेल.